Wednesday 27 November 2013

चिकन क्रिस्पी

चिकन क्रिस्पी साहित्यः १ मध्यम कांदा आडवा चिरलेला. १ मध्यम भोपळी मिरची लांबट उभी चिरलेली. (ज्युलियन्स.) १ लहान गाजर लांबट उभे चिरलेले. (ज्युलियन्स.) पातीचा कांदा सजावटीसाठी. १ इंच आल्याचे ज्युलियन्स. ४-५ लसुण पाकळ्या बारीक चिरलेल्या. १/२ वाटी कणिक. १/२ वाटी मैदा. २ अंड्यांतला पांढरा भाग. १/२ वाटी ताक. लाल तिखटं. मीठ चवी नुसार. ब्रेडचा चुरा. १/२ किलो चिकन (शक्यतो बोनलेस) लहान तुकडे करुन. १ चमचा आलं-लसुण पेस्ट. कृती: चिकनला आलं-लसणाची पेस्ट, मीठ, आणि लाल तिखटं लावुन १० मिनिटे मुरत ठेवावं. एका झिप लॉकच्या पिशवीत कणिक, मैदा, लाल तिखट एकत्र करुन त्यात चिकनचे वर मुरवलेले तुकडे टाकुन नीट एकत्र कराव. ताक आणि अंडी फेटुन एका बशीत काढुन घ्यावं. दुसर्‍या बशीत ब्रेडचा चुरा ठेवावा. ओव्हन २५० °C वर तापत ठेवावा. ट्रेला अ‍ॅल्युमिनियम फॉइल लावुन वरुन तेलाचा स्प्रे मारावा. चिकनचा एक एक तुकडा आधी अंड्यात बुडवुन मग ब्रेडच्या चुर्‍यात घोळवुन ट्रे मध्ये ठावावा. १५-२० मिनिटे. बेक करावं. (ओव्हन नसेल तर तेलात तळुन घेतले तरी चालतील.) एका कढईत थोड्या तेलावर आल लसुण आणि मिरची परतुन घ्यावी. त्यात कांदा आणि भोपळी मिरची टाकुन १ मिनिट नीट परतुन घ्यावं. मग त्यात पाती कांदा, गाजर, चीली सॉस्/ केचप टाकुन मोठ्या आचेवर १ मिनिट परतावे. भाज्या पुर्ण शिजवु नयेत. करकरीतपणा राहिला पाहिजे. नंतर त्यात चिकनचे तुकडे टाकुन परत १ मिनिटं मोठ्या आचेवर परतावे. वरुन पाती कांद्याने सजवुन गरमागरमच वाढावं.

Saturday 16 November 2013

ताकातली उकड - Takachi Ukad

ताकातली उकड - Takachi Ukad साहित्य: २ कप आंबट ताक तांदूळाचे पिठ ३-४ लसूण पाकळ्या १ इंच आल्याचा तुकडा ३-४ हिरव्या मिरच्या फोडणीसाठी: १/४ टिस्पून मोहोरी, १/४ टिस्पून जिरे, १/४ टिस्पून हिंग,१/२ टिस्पून हळद ३-४ कढीपत्ता पाने १ टेस्पून तेल मीठ कोथिंबीर कृती: १) कढईमध्ये १ टेस्पून तेल गरम करावे. तेलात मोहोरी, जिरे, हिंग, हळद, कढीपत्ता, मिरच्यांचे तुकडे घालावे. लसूण, आले ठेचून घालावे. सर्व व्यवस्थित परतले कि ताक घालावे. ताकाला उकळी येईस्तोवर ढवळत राहावे ज्यामुळे ताक फुटणार नाही. २) ताकाला उकळी आली कि त्यात चवीपुरते मिठ घालावे. आणि तांदळाचे पिठ वरून भुरभुरावे. गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्यावी कारण भराभर पिठ घातले तर हमखास गुठळ्या होतात. उकडीला जेवढा घट्टपणा हवा असेल तेवढे तांदूळाचे पिठ हळूहळू घालत ढवळत राहावे. वाफ काढावी. टीप: १) अजून एका पद्धतीने उकड बनवता येते. ताक थेट फोडणीस न घालता, ताकात तांदूळाचे पिठ घालून मध्यम दाटसर पेस्ट बनवून घ्यावी, मिठ घालावे. आणि हि पेस्ट फोडणीस घालावी. आणि लगेच ढवळावे. यामध्ये गुठळ्या पटकन होतात त्यामुळे थोडे अलर्ट राहावे. २) काहीजणांना एकदम घट्ट उकड आवडते. तशी उकड हवी असेल तर पिठाचे प्रमाण थोडे वाढवावे. उकडीची वाफ मुरली कि गरम असतानाच तेलाने उकड छान मळून घ्यावी आणि मग खावी.

कोल्हापूरी मिसळ - Kolhapuri Misal

कोल्हापूरी मिसळ - Kolhapuri Misal साहित्य: १ वाटी मटकी १ बटाटा तळण्यासाठी तेल १ कांदा १ टोमॅटो गरम मसाला फरसाण पोहे कुरमुर्याचा चिवडा कोथिंबीर लिंबू ब्रेडचे स्लाईस कट बनवण्यासाठी साहित्य :३-४ लसूण पाकळ्या १ इंच आले २-३ मिरी १ लहान काडी दालचिनी २-३ लवंगा १ तमालपत्र १ चमचा जिरेपूड १ चमचा धनेपूड अर्धी वाटी खवलेला ओला नारळ १ मध्यम कांदा २ मध्यम टोमॅटो ४-५ लहान चमचे लाल तिखट फोडणीसाठी तेल आमसुल किंवा चिंच मीठ कृती: १) मटकी १०-१२ तास कोमट पाण्यात भिजत घालावे. त्यात जर कडक मटकी आणि खडे असतील तर ते काढून टाकावे. सुती कपड्यात बांधून मोड काढावेत. २) मटकीला मोड आले कि कट बनवून घ्यावा. त्याचवेळी मटकी कूकरमध्ये २ शिट्ट्या करून शिजवून घ्यावी. ३) कट बनवण्यासाठी लसूण पाकळ्या, आले, मिर्या, दालचिनी, लवंगा, तमालपत्र, जिरेपूड,धनेपूड मिक्सरवर जेवढे बारीक होईल तेवढे बारीक करून घ्यावे. ४) कढईत ४-५ चमचे तेल गरम करावे. त्यात मिक्सरमधून काढलेला मसाला घालून खमंग परतावा. मसाल्याचा छान गंध सुटला कि त्यात १ कांद्याच्या आणि २ टोमॅटोच्या मोठ्या फोडी घालून परतत रहावे. सर्वात शेवटी खवलेला नारळ घालून परतावा. मिश्रणाला तेल सुटले आणि कांदा शिजला कि गॅस बंद करून बाजूला काढून थंड करावे. मिश्रण थंड झाले कि त्यात १ भांडे पाणी घालून मिक्सरवर पातळ पेस्ट करून घ्यावी. ५) नंतर मटकीची उसळ बनवून घ्यावी. पातेल्यात २-३ चमचे तेल गरम करावे. त्यात मोहोरी, हिंग, हळद घालून शिजवलेली मटकी घालावी. थोडे पाणी घालावे, १-२ चमचा गरम मसाला घालावा. बारीक गॅसवर उसळ उकळत असताना दुसर्या गॅसवर लहान कढईत अगदी थोडे बटाट्याचे तुकडे तळण्यापुरते तेल गरम करावे (साधारण अर्धी वाटी). (बटाटे तळल्यावर ७-८ चमचे तेल उरले कि त्यातच कट बनवता येतो.) ६) १ बटाटा सोलून त्याचे लहान चौकोनी तुकडे करावे, आणि मध्यम आचेवर बटाटे व्यवस्थित तळून घ्यावे, कच्चे राहू देऊ नये. तळलेले बटाट्याचे तुकडे उसळीत टाकावेत. चवीपुरते मिठ घालावे. ७) लहान कढई खालचा गॅस बारीक करून उरलेल्या तेलात हळद, हिंग, ४-५ चमचे लाल तिखट घालून तयार केलेली मसाल्याची पातळ पेस्ट घालावी. मीठ घालावे. आंबटपणासाठी २-३ आमसुल किंवा थोडा चिंचेचा कोळ घालावा. आवश्यकतेनुसार पाणी घालून १ उकळी काढावी. ८) उसळ आणि कट तयार झाला कि कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घ्यावा. ९) नंतर डिशमध्ये १ डाव उसळ घालावी. त्यावर १ पळी कट घालावा. त्यावर चिवडा, फरसाण, कांदा, टोमॅटो घालावे. लिंबू पिळून तयार मिसळ स्लाईस ब्रेडबरोबर खावी. टीप: १) ओला नारळ उपलब्ध नसेल किसलेला सुका नारळसुद्धा वापरू शकतो. २) ज्यांना तळलेले बटाटे नको असतील त्यांनी शिजवलेले बटाटे घातले तरी चालते. तळलेले बटाटे उसळीत फुटत नाहीत, शिजलेले बटाटे मिसळीत फुटून मिसळ घट्ट होऊ शकते.

Wednesday 13 November 2013

पाणी पुरी - Pani Puri

पाणी पुरी - साधारण ५० मध्यम पुर्‍या वेळ: ६० ते ७० मिनीटे panसाहित्य: ३/४ कप बारीक रवा २ टेस्पून मैदा चवीपुरते मिठ क्लब सोडा वॉटर (प्यायचा सोडा) तळण्यासाठी तेल इतर संबंधित पाककृती: पाणीपुरीचे स्टफिंग पाणीपुरीचे पाणी कृती: १) रवा, मैदा आणि मिठ एकत्र करावे. त्यात सोड वॉटर घालून एकदम घट्ट भिजवावे. सुती कपडा पाण्याने भिजवून घट्ट पिळून घ्यावा. भिजवलेला गोळा या कपड्याने १५ ते २० मिनीटे झाकून ठेवावे. २) नंतर भिजवलेल्या पिठाचे करवंदाएवढे छोटे गोळे करावे आणि ते गोळे कोरडे पडू नयेत म्हणून ओल्या फडक्याखाली ठेवून द्यावे. ३) तेल मध्यम आचेवर तापवावे. गोळे लाटून पुर्‍या तळाव्यात. तेल खुप गरम किंवा खुप कोमट नसावे. मध्यम आचेवर तेल तापवावे. ४) पुर्‍या तळल्यावर जाळीच्या रॅकवर (जो बेक केलेला केक गार करण्यासाठी वापरतात) तेल निथळण्यास ठेवाव्यात. या रॅकच्या खाली एकादे ताट ठेवावे म्हणजे निथळलेले तेल ताटात जमा होईल. ५) पुर्‍या शक्यतो कुरकूरीत राहातील. पण जर राहिल्या नाहीत तर बेकिंग ट्रे मध्ये पुर्‍या पसरवाव्यात. ओव्हन २०० F (९३ C) वर प्रिहीट करावा, बेकिंग ट्रे मधल्या रॅकवर ठेवावा आणि साधारण १० मिनीटे पुर्‍या बेक कराव्यात. बेक केल्यावर पुर्‍या नक्की कुरकूरीत राहतील.

हक्का नुडल्स - Hakka Noodles

वेळ: ३० मिनीटे वाढणी: २ जणांसाठी साहित्य: २ नूडल्स केक्स (५० ग्राम प्रत्येकी) १ टेस्पून तेल १/२ टेस्पून सोया सॉस ५ मोठ्या लसूण पाकळ्या १/२ इंच आलं १ टेस्पून मसाला चिली सॉस (मी मॅगी मसाला चिली सॉस वापरला होता) (टीप १ व २) १ टेस्पून टोमॅटो पेस्ट चवीपुरते मिठ १/२ टिस्पून व्हिनेगर भाज्या: भोपळी मिरची, गाजर, कोबी, मश्रुम, पाती कांदा - पातळ उभे चिरून (भाज्या सममसान घ्याव्या तसेच शिजलेल्या नूडल्सच्या १/३ प्रमाणात असाव्यात) २ ते ३ टेस्पून पाती कांदा, बारीक चिरून कृती: १) जवळजवळ ६ कप पाणी मोठ्या पातेल्यात उकळत ठेवावे. त्यात १-२ चमचे मिठ घालावे. पाणी उकळले कि नूडल्स घालाव्यात आणि शिजू द्याव्यात. नूडल्स ९०% शिजल्या कि लगेच गार पाण्यात घालाव्यात. २) लसूण+आलं+चिली सॉस+टोमॅटो पेस्ट एकत्र करून बारीक पेस्ट बनवून घ्यावी. ३) कढईत तेल तापवावे. त्यात तयार केलेली पेस्ट घालून परतावे. काही सेकंद परतावे. ४) भाज्या घालून साधारण १० ते १२ सेकंद, मोठ्या आचेवर परतावे. नंतर नूडल्स मधील पाणी काढून त्या घालाव्यात. सोया सॉस घालून निट मिक्स करावे. शेवटी व्हिनेगर घालून मिक्स करावे. लागल्यास थोडे मिठ घालावे. पाती कांदा वरती सजवावा व गरमा गरम सर्व्ह करावे. टीपा: १) लहान मुलांसाठी बनवताना चिली सॉस न वापरता साधा टोमॅटो सॉस वापरावा. तसेच आलं लसूणसुद्धा तिखटपणा वाढवते. त्याचे प्रमाण कमी करावे. २) मसाला चिली सॉस बर्‍यापैकी तिखट असतो. पण अजून तिखटपणा वाढवायचा असल्यास चिमूटभर रेड चिली फ्लेक्स नूडल्सवर पेरावे.

Tuesday 12 November 2013

PALAK PANEER

पालक पनीर - Palak Paneer २ ते ३ जणांसाठी वेळ: ४० मिनीटे साहित्य: ४०० ग्राम पालक (साधारण २ जुड्या) (खुडलेला) १५० ग्राम ताजे पनीर १/२ कप कांदा, बारीक चिरलेला १ मध्यम टोमॅटो १/२ टिस्पून जिरे १ टिस्पून लसूण पेस्ट १/२ टिस्पून आले पेस्ट २-३ हिरव्या मिरच्या, कुटून १ टिस्पून धणेपूड १/२ टिस्पून जिरेपूड १ टिस्पून कसूरी मेथी खडा गरम मसाला (१ वेलची, १ तमालपत्र, २ लवंगा, १ लहान काडी दालचिनी). ३ टेस्पून तेल मीठ चवीनुसार कृती: १) पालक धुवून त्याची पाने खुडून घ्यावी. एका पातेल्यात पाणी करत ठेवावे. पाणी गरम झाले त्यात पालक घालून झाकण न ठेवता उकळी काढावी.२-३ मिनीटांनी सर्व पाणी काढून पालक थोडा थंड होवू द्यावा. थंड झाला कि मिक्सरवर पाणी न घालता बारीक पेस्ट करून घ्यावी. २) टोमॅटो ब्लांच करून घ्यावा. त्यासाठी पातेल्यात टोमॅटो बुडेल इतपत पाणी गरम करावे. टोमॅटोला हलकेच सालाला चिर द्यावी सोलताना सोपे जाते. पाणी उकळले कि त्यात टोमॅटो २ मिनीटे शिजू द्यावा. नंतर लगेच थंड पाण्यात घालावा यामुळे साल निघायला मदत होईल. साल काढून आतल्या भागाची प्युरी करावी. ३) नॉनस्टीक फ्राईंग पॅनमध्ये २ टेस्पून चमचे तेल गरम करावे. खडा गरम मसाला घालावा. १/२ मिनीट फ्राय करून जिरे घालावे. बारीक चिरलेला कांदा घालून गोल्डन ब्राउन होईस्तोवर परतावे. नंतर आलेलसूण पेस्ट घालावी. आलेलसणीचा छान वास सुटला कि टोमॅटो घालून परतावे. टोमॅटो प्युरी घालून त्याचा कच्चट वास जाईस्तोवर परतावे. ४) त्यात धणेजिरेपूड, कसूरी मेथी घालावी. त्यात पालकाची पेस्ट, मिठ आणि मिरचीची पेस्ट घालावी. मध्यम आचेवर ५ मिनीटे शिजू द्यावे. ५) १ उकळी काढून पनीरचे तुकडे घालावेत. १-२ मिनीटानंतर गॅस बंद करावा. गरमागरम सर्व्ह करावे. टीप: १) आवडत असल्यास पालक पनीर तयार झाल्यावर त्यात १/२ वाटी क्रिम घालू शकतो. २) जर पनीर ताजे नसेल तर आधी डीप फ्राय करून घ्यावे.